आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलबरोबरच आता दरवर्षी टी-20 वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत आयसीसीनं अंतिम निर्णय घेतला नसला तरी, यावर विचारविनिमय सुरू आहे.

आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या प्रस्तावात प्रत्येक वर्षी टी-20 वर्ल्ड कप तर, दर तीन वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे. आयसीसीला 2023 आणि 2028 दरम्यान जागतिक मिडीया अधिकार बाजारात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्टार स्पोर्ट्ससोबत आयसीसीची बोलणी सुरू आहे.

दरम्यान बीसीसीआय आयसीसीच्या या प्रस्तावाशी सहमत नाही आहे. त्यामुळं या दोघांमध्ये या प्रस्तावावरून वाद सुरू आहे. आयसीसीच्या प्रस्तावामुळं बीसीसीआयच्या कार्यक्रमांकावर आणि मिडीया अधिकारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

सध्या वर्ल्ड कपचे आयोजन चार वर्षांतून एकदा केले जाते. तर, टी-20 वर्ल्डची योजना दोन वर्षातून एकदा केली जाते. 2007मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड दक्षिण आफ्रिका येथे खेळवण्यात आला. त्यानंतर 2009मध्ये दुसरा वर्ल्ड कप झाला. एका वर्षात 2010मध्ये तिसऱ्या वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. मात्र आयसीसीच्या एफटीपी कॅलेंडर पाहता दरवर्षी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन इतर देशांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

आयसीसी आणि इतर सदस्य पाच वर्षांसाठी वेग-वेगळ्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करतात. यासाठीचे वेळापत्रक आधीच तयार करण्यात आले आहे. त्यामुळं बीसीसीआयच्या वतीनं या प्रस्वावाला नकार देण्यात आला आहे. यातच बीसीसीआयच्या वतीनं आयपीएल स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्यामुळं या टी-20 वर्ल्ड कपचा फटका आयपीएललाही बसू शकतो.

2020मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप 2023मध्ये भारतात होणार आहे. मात्र जर दरवर्षी टी-20 वर्ल्ड कप झाल्यास 2021मध्ये भारतात टी-20 वर्ल्ड होऊ शकतो. दरम्यान यांसदर्भात आयसीसी आणि इतर देशांमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. दुसरीकडे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी आयसीसीच्या या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळं आयसीसीच्या प्रस्तवाचे पुढे काय होणार हे पाहावे लागणार आहे.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: