कर्करोग तज्ज्ञ एखाद्या रुग्णाला कर्करोग झालाय की नाही याचे निदान करायला मोठा वेळ घेतात. मुळात लोक कसलाही त्रास होत नसेल तर कर्करोगविषयक चाचणी करूनच घेत नाहीत. पण एखादा रुग्ण काही त्रास व्हायला लागला की तपासणी करून घेतो मात्र या चाचणीला उशीर झाला असेल तर कर्करोग बराच वाढलेला असतो आणि तो पुढच्या पायरीवर असेल तर इलाज चालत नाही.

 

म्हणून ही गोष्ट वारंवार सांगितली जाते की वेळीच तपासणी करून घ्या. तशी ती करता यावी यासाठी आता शास्त्रज्ञांनी एक साधे साधन तयार केले आहे. या साधनामुळे एखाद्या रुग्णाचा कर्करोग ताबडतोब समजून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या व्यक्तीला कर्करोग झालाय की नाही हे केवळ दहा सेकंदात कळू शकेल असे वाटते. सध्याच्या अशा तपासणीच्या वेगापेक्षा या तपासणीचा वेग १५० पटीने जास्त असेल.

 

हे साधन म्हणजे कर्करोगाच्या निदानाच्या क्षेत्रातली एक क्रांती मानली जात आहे जी मानवतेला उपकारक ठरली आहे. या साधनाचे नाव आहे मास स्पेक पेन. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्कास या विद्यापीठाने ही माहिती प्रसारित केली आहे. शस्त्रक्रिया करताना हाती आलेल्या कर्करोग विषयक पेशींचे विश्‍लेषण करून ही चाचणी केली गेली. तेव्हा झालेले निदान ९६ टक्के अचूक ठरले. अशा पेशी सापडल्या की डॉक्टरांना त्या नेमक्या पेशी काढून टाकून उपाययोजनाही नेमकेपणाने करता आली. म्हणजे उपायाचाही दर्जा सुधारणार आहे आणि कर्करोगाच्या प्रसाराला बंधन घालता येणार आहे.

 

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत कर्करोगाच्या पेशींचा समूळ नायनाट करणे फार गरजेचे असते. कारण एखादीही पेशी राहून गेली तरी कर्करोग पुन्हा वाढण्याची शक्यता असते. पण या साधनामुळे कर्करोगाची शेवटची पेशीही सापडते आणि ती काढून टाकता येते. अमेरिकेतल्या एका संशोधन संस्थेत या साधनाची चाचणी घेण्यात आली.

 

२५३ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करून काढून टाकलेल्या पेेशींचे परीक्षण करण्यात आले. या साधनाने कर्करोगाच्या पेशी आणि सामान्य निरोगी पेशी यातला फरक ताबडतोब दाखवून दिला. विशेष म्हणजे या साधनाची ही चाचणी सगळ्या प्रकारच्या कर्करोगांवर यशस्वी झाली. या साधनाने सोबतच्या संगणकावर सामान्य पेशी आणि कर्करोगाच्या पेशी असे वर्गीकरण करून लगेच स्क्रीनवर तसे उमटवले .

सूचना : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी आम्ही घेत नाही.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: