पुणे : कोरोना विषाणूबाधित पाच रुग्ण आढळल्यानंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. पुण्यातील अनेक शाळाही पुढील काही दिवस बंद राहणार आहेत, तर खबरदारीसाठी खाजगी रुग्णालयातील शंभर बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. 

 

पुण्यातील विविध खाजगी रुग्णालयातील तब्बल शंभर बेड्स ताब्यात घेण्यात आले आहेत. रुबी हॉस्पिटलसह 18 खाजगी रुग्णालयांचे बेड्स जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. गरज पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल 11 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.

 

कात्रज, सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

 

पुण्यात कोरोनाचा शिरकाव

दुबईहून आलेल्या पुणेकर दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांनाही संसर्ग झाल्याचं उघड झालं. यामध्ये दाम्पत्याचीच कन्या, नातेवाईक आणि संबंधित कुटुंबाला मुंबईहून पुण्याहून घेऊन येणाऱ्या ओला कॅब चालकाचा समावेश आहे.

 

कोरोनाबाधित सर्व रुग्णांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून सौम्य स्वरुपाचा कोरोना असल्याची माहिती आहे.

 

आरोग्यमंत्र्यांचा सल्ला :

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली, तरी ती बरी होऊ शकते. कोरोना 80 टक्के सौम्य स्वरुपाचा आहे. त्यानंतर 10 ते 15 टक्के गंभीर, तर 5 टक्के अतिगंभीर स्वरुपाचा असतो. यामध्ये 2 ते 5 टक्के मृत्यूदर आहे,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

 

सर्वांनी काळजी घ्या. चिकन-मटण खाऊ नये अशा ज्या अफवा पसरल्या आहेत. त्या धादांत खोट्या आहेत. चिकन मटण न खाल्ल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तुम्हाला जे काही खायचं आहे ते व्यवस्थित शिजवून खाल्लं पाहिजे. विशिष्ट उच्च तापमानावर कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा इन्क्यूबेशन पिरेड हा किमान 14 दिवसांपासून 28 दिवसांपर्यत इनक्यूबेशन असतो, असंही टोपेंनी स्पष्ट केलं होतं.

 

“सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी हे भारतीयांसाठी नियमित आजार आहेत. त्याचा अर्थ कोरोना झाला, असा गैरसमज करुन घेऊ नये. हा आजार हवेतून संसर्ग होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्याद्वारे कोरोनाचे विषाणू पसरतात. त्यामुळे एक मीटरपर्यंत सुरक्षित अंतर ठेवावे,” असंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

 

‘कोणतेही ठराविक मास्क किंवा सॅनिटाझर वापरण्याची आवश्यकता नाही. हे सर्व भीतीमुळे होत आहे. याबाबत जनजागृती सुरु आहे. पुण्यातील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून सर्वांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील मेट्रो सिटी, जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षात वाढ केली आहे,” अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: