बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मंगळवारी रात्री जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात पोहोचली होती. तिने यावेळी हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दीपिका दिल्लीत होती. तिने यावेळी विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दीपिका जेएनयूमध्ये पोहोचली होती. पण तिने कोणत्याही प्रकारचे भाषण केले नाही. दीपिका सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास विद्यापीठात दाखल झाली. यावेळी कन्हैय्या कुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली होती.

 

जेएनयूमध्ये दीपिका पोहोचल्याची बातमी आणि फोटो समोर येताच तिच्याविरोधात सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला. तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी काही वेळातच होऊ लागली. ट्विटरवर #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठीच दीपिका तिथे आली होती असा आरोप काहीजणांनी केला आहे. दिल्लीत नसती तर दीपिका आलीच नसती असेही काहींचे म्हणणे आहे.

 

दीपिकाविरोधात ट्रेंड सुरु असतानाच काहीजण तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. दीपिकाने घेतलेल्या भूमिकेवरुन तिचे कौतुक देखील केले जात आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुधारित नागरिकत्व कायदा असो किंवा जेएनयू हिंसाचार शांत राहणे पसंत केले असतानाच दीपिकाने ठोस भूमिका घेतली असल्याचे त्यांचे म्हणणे असल्यामुळे यामुळे ट्विटरवर #boycottchhapaak ट्रेंड होत असताना #IsupportDeepika हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे.

 

दीपिकावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना तिच्या समर्थकांनी ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळी करणी सेनेने तिचे नाक कापण्याची धमकी दिली होती याची आठवण करुन दिली. तसेच चित्रपटाला फटका बसेल याची कल्पना असतानाही दीपिकाने आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे सांगत हा पब्लिसिटी स्टंट नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: