मंचर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मला निवडून द्या, बैलगाडा शर्यत सुरू करतो, असे आश्‍वासन लोकसभा निवडणुकीत दिले होते. परंतु, बैलगाडा शर्यत अद्याप सुरू न झाल्याने त्यांनी मतदारांची फसवणूक केली आहे. खासदार कोल्हे कुठे आहेत? असा सवाल माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या प्रचाराची सांगता सभा मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते आढळराव पाटील बोलत होते. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, उमेदवार राजाराम बाणखेले, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, युवानेते अक्षय आढळराव पाटील, कल्पना आढळराव पाटील, जयसिंग एरंडे, अरुण गिरे, देविदास दरेकर, सुरेश भोर, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, दत्ता गांजाळे, डॉ. ताराचंद कराळे, सागर काजळे, कल्पेश बाणखेले, कैलास राजगुरव, जयश्री पलांडे, मालती थोरात, सचिन बांगर यांच्यासह शिवसेना, भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबीयाची मक्‍तेदारी आहे. ती मोडण्यासाठी मतदारांनी प्रामाणिकपणे मतदान करुन विकासाच्या वल्गना करणाऱ्यांना पराभूत करावे. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. घड्याळ बंद पडले आहे. त्यामुळे अशा लोकांपासून मतदारांनी सावध रहावे, असे त्यांनी नमूद केले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: