नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (21 ऑक्टोबर) मतदान झालं. सर्वच नेत्यांनी सकाळी पहिल्यांदा मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, याला छगन भुजबळ अपवाद ठरले आहेत. भुजबळ दिवसभर आपल्या मतदारसंघात फिरत प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. मतदारसंघात मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत आणि अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्न करत होते. मात्र, स्वतः भुजबळांनी मतदान न केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मतदान न केल्याबद्दल विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, “मी स्वतः उमेदवार असल्यामुळे मतदारसंघात फिरत होतो. माझा मतदारसंघ उभा-आडवा प्रचंड मोठा आहे. मी सकाळी निघून फिरण्यास सुरुवात केली, तरिही सायंकाळपर्यंत संपूर्ण मतदारसंघात पोहचू शकलेलो नाही. त्यामुळे मी मतदान करु शकलो नाही.”

एक्झिट पोल काहीही येवोत मी माझ्या येवला मतदारसंघातून 1 लाख मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “नाशिकमध्ये मी जास्तीत जास्त फिरलो. नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांपैकी 12 जागा तरी आम्हाला कमीत कमी मिळतील. यावेळी निश्चितपणे सरकार बदलेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे.”

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यापासून शरद पवारांवरील ईडीची कारवाई या गोष्टी लोकांना आवडलेलं नाही. याविषयी जनतेत संताप आहे. हा संताप आज मतदानाच्या स्वरुपात मतपेटीत बंद झाला आहे. 24 ऑक्टोबरला निकालाच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचेच सरकार येईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

येवला-लासलगाव मतदारसंघात मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह आहे. अनेक गावांमध्ये 75 ते 80 टक्के मतदान झाल्याचंही भुजबळांनी नमूद केलं.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: