मुंबई : सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत निवडणूकी आधी आणि निवडणूकीनंतरही आमचं ठरलंय, असे सांगत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपाला बंडखोरांचा फटका बसला असल्याची कबूली देतानाच जे बंडखोर अपक्ष म्हणून जिंकून आले आहेत ते आमच्यासोबत येतील, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्टपण कौल दिला आहे. त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. सत्तावाटपाच्या फॉर्म्यल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, निकालानंतर माझे उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोलणे झाले आहे. आमचे आधीच ठरले आहे.

त्यानुसारच पुढची वाटचाल करणार आहोत. आमचे काय ठरले आहे हे योग्य वेळी कळेलच, असे सांगताना त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन मिळेल काय या प्रश्नावर असे कोणी कोणाला समर्थन देण्याचा प्रकार होणार नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा विजय साजरा करण्याची वेळ आहे. विश्‍लेषण करण्याची वेळ नाही. भाजपने मागील निवडणुकीत 260 जागा लढवल्या आणि 122 जागांवर विजय झाला. यंदा आम्ही मित्रपक्षांसह 164 जागा लढवल्या. आताच्या कलानुसार 105 किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील. म्हणजे 164 जागा लढवून आम्हाला 26.5 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे मतांमध्ये भरघोस वाढ झाली आहे. यंदा 122 पेक्षा कमी जागा आहेत. आम्ही कमी जागा लढवल्या पण महाराष्ट्राच्या इतिहासातील निवडून येणा-या राजकीय पक्षांचे स्ट्राईक रेट बघितले तर सर्वाधिक स्ट्राईक रेट हा भाजप-शिवसेना महायुतीचा आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: