भाजप-शिवसेनेची मुख्यमंत्रिपदावरुन खेचाखेची सुरु असताना, तिकडे मित्रपक्षांनी बैठक घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत. पाच वर्षांसाठी तेच मुख्यमंत्री असावेत, तसंच मित्रपक्षांना मंत्रिपदं द्या, अशी मागण्या रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

युतीतील घटक पक्षांचे नेते रामदास आठवले, अविनाश महातेकर, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची बैठक झाली. या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत घटकपक्षांच्या मागण्या मांडल्या.

“आमचा पक्ष, जानकर यांचा पक्ष, सदाभाऊ खोत आम्ही सर्व भाजपसोबत आहोत. आम्हाला दोन मंत्रिपदे मिळाली होती. शेवटी शेवटी आरपीआयला मंत्रिपद मिळालं. विनायक मेटे यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे सर्व मित्रपक्षांच्या वाट्याला मंत्रिपद यावं”, असं आठवले म्हणाले.

“आता निवडून येण्याचं प्रमाण जास्त आहे. कोणताच पक्ष 100 च्या पुढे गेला नव्हता. पण भाजप 100 च्या वर गेला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व धुरा होती. काल देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाली आहे. त्याचा ठरावही केला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकरात निर्णय घ्यावा”, असं रामदास आठवले यांनी नमूद केलं.

“आम्हाला चारही पक्षांना मंत्रिपद मिळावीत. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहोत. चौघांना मंत्रिपदं मागितली तर एक पण मिळणार नाही. भाजपचे 120 आमदार झालेत. मागच्या वेळेप्रमाणे सेनेला 15 मंत्रिपदे देण्याची शक्यता. आणखी काही महत्वाची खाती देतील”, असं आठवले म्हणाले.

अमित शहा लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यानंतर प्रश्न मिटणार आहे. आमचे मित्र पक्षाचे 7 आमदार आहेत. घटक पक्षांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत असं वाटतं. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच नाही. अडीच वर्षाचा फॉर्म्युला आम्हाला मंजूर नाही, पाच वर्षाचाच फॉर्म्युला योग्य आहे, असंही आठवलेंनी सांगितलं.105 भाजप, 7 मित्रपक्ष, 8 अपक्ष यांच्यामुळे भाजपचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: