ठाणे : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी तालुका विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.भिवंडी तालुक्यातील महापोली, पालखणे, सूर्यानगर, विश्‍वगड, झिडके येथील पाहणी त्यांनी केली.

अतिवृष्टी झालेल्या शेतशिवाराला राज्यमंत्री खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासनास लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले. बाजार समिती आवारात शेतकरी व प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला आणि शेतकर्‍यांना मदतीचा दिलासा दिला.

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. या सर्व शेतकर्‍यांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत.

त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई निश्‍चितपणे दिली जाणार आहे. नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: