विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींनी आज वेग पकडला आहे. एकीकडे भाजपच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांचीही आज बैठक पार पडली. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर ठाम असून शिवसेनेकडून आमदार फुटू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्यात येत असून रंगशारदा हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. युती तोडण्याची माझी अजिबात इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावे, आमची बाकी काही अपेक्षा नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.

मातोश्रीवर ही बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शिवसेना अजूनही सत्तेतल्या ५०-५० टक्के वाट्यावर ठाम असल्याचे दिसते. युतीचे जे लोकसभेच्या वेळी ठरले होते, तसेच व्हावे याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

जो निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील, त्या निर्णयासोबत आपण असल्याची ग्वाही या बैठकीत उद्धव ठाकरे यांना या आमदारांनी दिली. आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचे आहे.

शिवसेनेचे ५६ आमदार त्याचबरोबर शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले असून हे सर्व आमदार पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. दरम्यान, अवघे दोन दिवस काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास शिल्लक असल्याने भाजप आणि शिवसेना यांनाच सत्तास्थापनेचा पेच सोडवावा लागणार आहे. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: