शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात येईल आणि पाच वर्षे कायम राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि पीडितांच्या भावना समजून घेण्यासाठी शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. गेली दोन दिवस ते नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत पवार शुक्रवारी (15 नोव्हेंबर 2019) बोलत होते.

या वेळी बोलताना शरद पवार यांनी अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकासानीची तपशीलवार माहिती प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, पत्रकारांनी राजकीय विषयांवर प्रश्न विचारले असता पवार यांनी आपल्या खास आणि मिश्किल भाषेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल.

तसेच, ते पाच वर्षे सत्तेत कायम राहिल. शिवसेनेचे टोकदार हिंदूत्व आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका यात कसा मेळ घालणार असेल विचारले असता, शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका आहे हे खरं आहे. आम्हाला ते माहित आहे. पण आम्ही सर्वधर्म समभाव आणि संहिष्णुता मानणारे लोक आहोत. त्यामुळे या सर्व गोष्टींवर विचार करुनच कार्यक्रम आखला जाईल. आघाडी सरकारमध्ये किमान समान कार्यक्रम हा त्याचसाठी तयार केला जातो. या सरकारमध्येही तो तयार केला जाईल असे पवार म्हणाले.

मुंबईतील एक उद्योगपती शिवसेना-भाजप यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार फुटू शकतात अशा बातम्या येत असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांना विचारले असता, अद्याप आपल्या कानावर तरी अशी काही गोष्ट आली नाही. पण, आपल्याकडे या संदर्भात काही माहिती असल्यास ती आम्हाला द्या म्हणजे आम्ही अधिक काळजी घेऊ, अशी मिश्किल प्रतिक्रियाही पवार यांनी या वेळी दिली.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: