मुंबई: आज विधानभवनात आमदारकीची शपथ घेण्यासाठी दाखल झालेल्या अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी आपल्याला याआधीच सांगितले होते की मी राष्ट्रवादीमध्येच होतो, त्यामुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

 

तसेच मी बंडखोरी केली अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, पण असे काही नाही. मी राष्ट्रवादीसोबतच होतो, आहे आणि कायम राहणार. त्याचबरोबर शरद पवार हेच आमचे नेते असल्याचे स्पष्ट केले.

 

भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात अजित पवार यांच्या बंडामुळे फूट पडल्याचे वृत्त होते. पण, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक तऱ्हेने अजित पवार यांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या भेटीला पवार कुटुंबातील सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेतेही गेले होते. अखेर अजित पवार यांचं मन वळवण्यात त्यांना यश आले.

 

त्यांनी काल दुपारी मतपरिवर्तन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काल रात्री शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अजित पवार यांच्या भूमिकेमुळे पूर्ण ढवळून निघाले होते. आज त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची भूमिका आणि बंड याबाबत विचारणा केली. त्यावेळी मी राष्ट्रवादीतच आहे, होतो आणि राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. अजित पवार यांनी शपथविधीला जाण्याआधी प्रतिक्रिया दिली. आमचे नेते शरद पवार हेच असून, मी राष्ट्रवादीतच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांना यावेळी शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, पवार हे आमचे नेते असल्यामुळे मी त्यांची भेट घेणे सहाजिकच आहे आणि तो माझा अधिकारही आहे. त्याचबरोबर आम्ही नेहमीच आनंदी असतो. काळजी करण्याचे कारण नाही. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: