नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा  केली आहे. दिल्लीकरांना वीज, पाणी, बससेवा हे सर्व मोफत दिल्यानंतर आता वायफायही फ्री मिळणार  आहे. केजरीवाल यांनी बुधवारी (4 डिसेंबर) ही घोषणा केली. आम आदमी पक्षाची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मानली जात आहे. येत्या 16 डिसेंबरपासून दिल्लीकरांना या फ्री वायफाय योजनेचा उपभोग घेता येणार आहे.

 

दिल्लीत पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार वायफाय हॉटस्पॉट लावण्यात येतील असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. येत्या 16 डिसेंबरला 100 हॉटस्पॉटचे उद्धाटन करण्यात येणार असून त्याच दिवसापासून ते सुरु करण्यात येणार आहे.

 

दिल्लीतील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 100 हॉटस्पॉट दिले जाणार आहे. दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट लावण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यात 150 ते 200 लोक एका ठिकाणी एकत्र या वायफाय सेवेचा उपयोग करु शकणार आहेत. यातील 4 हजार हॉटस्पॉट बस स्टँडवर आणि इतर 7 हजार मार्केट परिसरात लावले जाणार आहेत. विशेष म्हणजे दिल्लीत फ्री वायफाय देण्याचा निर्णयाला कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. त्याची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

दर महिना 15 जीबी डेटा

 

प्रत्येक हॉटस्पॉट हा 100 मीटर अंतरापर्यंत काम करणार आहे. याचा वेग 100 एमबीपीएस इतका असून काही ठिकाणी तो 200 एमबीपीएस इतका असू शकतो. प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 15 जीबी डेटा फ्री मिळणार आहे. तर दररोज 1.5 जीबी पर्यंत डेटाचा तुम्हाला वापर करता येणार आहे. एका हॉट स्पॉटवर एका वेळी एकत्र 150 ते 200 लोक काम करु शकणार आहेत.

 

या वायफायचा वापर करण्यासाठी एक अॅप बनवलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. यानंतर वायफाय सुरु होईल. विशेष म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतरही हा वायफाय सुरु राहणार आहे.

 

फ्री वायफाय योजनेची अंमलबजावणी केल्यानंतर आमचं शेवटचे वचनही पूर्ण होईल. या फ्री वायफाय योजनेचा फायदा शाळकरी मुलांसह इतरांनाही होईल असे केजरीवाल म्हणाले. हे हॉटस्पॉट भाडेतत्त्वावर लावण्यात येणार आहे. या हॉटस्पॉटचा खर्च प्रति महिन्यानुसार सरकार कंपन्यांना देणार आहे.

 

दरम्यान येत्या 16 डिसेंबरला 100 हॉट स्पॉट लावले जाणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला 600 आणि 30 डिसेंबरला 1100 हॉटस्पॉट लावण्यात येणार आहे. यानंतर पुढील सहा महिन्यात 11 हजार हॉट स्पॉट लावण्यात येणार (Free WiFi in Delhi) आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: