मुंबई ।  हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. या चकमकीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवली.

 

झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचं राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी हैदाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेलं. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं.

‘आरोपी पोलिसांकडील बंदूक हिसकावून पळत होते आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं सांगितलं जात आहे. मात्र, यात संशयाला जागा आहे. आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावून घेतली, असं घटकाभर गृहित धरलं, तरी प्रश्न पडतो की पोलीस एवढे बेसावध आणि निष्काळजी होते का?’ असा सवाल निकम यांनी व्यक्त केला.

 

'सामान्य नागिरक आजच्या एन्काउंटरबद्दल पोलिसांचं अभिनंदन करत आहेत. समाधान व्यक्त करत आहेत. न्याय झाल्याची त्यांची भावना आहे. सामान्य नागरिक म्हणून मलाही तसं वाटू शकतं. मात्र, लोकांना समाधान वाटतं म्हणून पोलिसांनी अशी कृत्ये करायचं ठरवलं तर अराजक माजेल. कायद्यानं प्रस्थापित केलेलं राज्य ही संकल्पनाच नष्ट होईल, अशी भीती निकम यांनी व्यक्त केली.

 

पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात उसळलेली संतापाची लाट समाधानात परिवर्तित होताना दिसत आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: