बीड : ‘मी नेहमीच हसरा असतो, माझा चेहरा कायम प्रसन्न असल्याचं अनेकांचं म्हणणं असतं. अगदी राजीनामा दिला त्या दिवशीही माझ्या चेहऱ्यावर काही दुःख नव्हतं, हास्य होतं’, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले. खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह गोपीनाथगडावर दाखल झाले.

 

‘माझ्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या सहवासात वर्षानुवर्ष काढल्यामुळे अनेक संस्कार आमच्यावरही झाले. त्यांचा जयंती उत्सव संपूर्ण देशात कार्यकर्ते साजरा करतात. आज गोपीनाथ गडावर हा सोहळा साजरा होत आहे.’ असं खडसे म्हणाले.

 

‘मागची पाच वर्ष आमचं सरकार असताना येत होतो, आणि आता आमचं सरकार नसताना येत आहोत. सरकारमध्ये असताना आमचे कार्यकर्ते जरा बिझी राहायचे, त्यांना वेळ मिळत नव्हता. नेत्यांनाही नव्हता. आता आमच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे आनंदाने सगळे जण इथे येत आहेत.’ असंही खडसे म्हणाले. बागेश्वरी देवी मंदिरात दर्शन घेऊन खडसे बापलेक गोपीनाथ गडावर रवाना झाले.

 

चंद्रकांत पाटील आता प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पहिल्यांदा ते या ठिकाणी येत आहेत. ते काय बोलणार आहेत याची मला देखील उत्सुकता आहे, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं. कुणामुळे कुणाची तिकीट कापली गेली, कोणाचा पराभव झाला, हा बाहेर चर्चा करण्याचा विषय नाही, हा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षाच्या बैठकांमध्ये हा विषय चर्चेला येईल, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: