पुणे : संजय काकडेंनी प्रसिद्धीसाठी हे वक्तव्य केले असावे, अशी टीका भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ  यांनी केली आहे. भाजप खासदार संजय काकडेंनी भाजप नेत्या पंकंजा मुंडेंवर टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी आज (13 डिसेंबर) मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन काकडेंच्या  वक्तव्याचा समाचार घेतला.

 

“संजय काकडेंनी जे वक्तव्य केले त्याचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. मला वाटत नाही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले पाहिजे. काही लोकांना पत्रकारांसमोर जाऊन बोलायची सवय असते त्यासाठी ते बोलले असतील”, अशी टीका माधुरी मिसाळ यांनी काकडेंवर केली.

 

“भाजपमध्ये फूट पाडून कुणाला पोळी भाजायची आहे माहीत नाही. ही पत्रकार परिषद मी यासाठी घेतली की अशा काही शक्ती कार्यरत आहेत ज्यामुळे भाजपचे दुभाजन व्हावे असा कोण प्रयत्न करत आहे अशी शंका उपस्थित होत आहेत”, असंही मिसाळ म्हणाल्या.

 

“गेल्या दोन-तीन दिवसात टीव्हीवर, वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियातून काही बातम्या बाहेर येत आहेत. काही अशा शक्ती आहेत ज्यांना भाजपमध्ये फूट पाडायची आहे. त्यामुळे अशा काही बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. गेले पाचवर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम केले. त्यांनी आम्हा सर्वांना एकत्र ठेवून पक्ष चालवला, सरकार चालवले”, असं मिसाळ यांनी सांगितले.

 

“पंकजा मुंडे यांनी पक्षासाठी खूप काम केले आहे. मुंडे साहेबांनंतर त्याच आमच्या नेत्या आहेत. आता पंकजा मुंडे यांच्याकडे कोणतेही पद नाही म्हणून सामाजिक काम गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिष्ठानातर्फे करणार आहेत. मुंडे प्रतिष्ठानातर्फे काम करणे त्यात काही चुकीचे नाही”, असंही मिसाळ यांनी सांगितले.

 

यावेळी मिसाळ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या वक्तव्यावरही निषेध नोदंवला. “राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया असं वक्तव्य केले. त्यामुळे मी त्यांचा निषेध नोंदवते. त्यांनी अशी वक्तव्ये करु नये, मी सर्व महिला आमदारांकडून त्यांचा निषेध नोंदवते”, असं मिसाळ म्हणाल्या.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: