मुंबई : गोपीनाथ गडावरील मेळाव्यानंतर आज काही वृत्तवाहिन्यांना भाजपच्या नेत्या आणि माजी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष मुलाखत दिली. त्यांनी यावेळी एक अत्यंत मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याला फडणवीस यांच्या गनिमी काव्याबाबत काहीच माहिती नसल्याची खळबळजनक माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. कोअर कमिटीमधील महत्त्वाच्या सदस्याला देखील अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय माहित नसल्याने आता याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

मला काडीमात्र अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयाबाबत कल्पना नव्हती. खर तर याविषयी मला अजिबात आनंद झाला नव्हता. तो माझ्यासाठी खूप मोठा शॉक होता. मला व्यक्तीश: हा एक धक्का होता. खर तर फडणवीस यांनी जेव्हा सत्ता स्थापन केली तेव्हा मी ट्विट देखील केले होते की, राष्ट्रपती राजवटीतून राज्याला बाहेर काढल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, पण त्यांच्या या सत्ता स्थापनेमुळे फारसा आनंद झाला नव्हता.

 

कारण की, शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र असल्यामुळे त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणासोबत सत्तास्थापनेचा विचार मला तरी पटला नसल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे. माझी इच्छा आहे की, ज्यांचे सरकार सत्तेत आले आहे, त्यांना त्याचे काम करु द्यावे. आपण आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत कायम राहावे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

पंकजा मुंडे मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे… या वाक्यामुळे राजकीय नुकसान झालं का? या प्रश्नाबाबत बोलताना म्हणाल्या की, खर तर विधानसभेच्या निकालानंतर अनेकांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरु होती. उद्धव ठाकरेंपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांच्या नावाची त्यामध्ये चर्चा होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या नावाची देखील चर्चा होती.

 

तर मग मला एक सांगा, मी जर मनातील मुख्यमंत्री असे म्हणाले असेल तरी मला एवढे नालायक का ठरवले गेले? मनातील मुख्यमंत्री याबाबत जसे मागील पाच वर्ष मला त्रास झाला तसाच त्रास देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ यावरुन पुढील पाच वर्ष होऊ शकतो, असा टोमणा देखील पंकजा मुंडेंनी फडणवीसांना लगावला.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: