मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या घोटाळ्याची चौकशी आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच लावली होती, असा गौप्यस्फोट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्यांची खैर नाही, असे सांगत त्यांनी यामागे युती सरकारचा हात नसल्याचे स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उममुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, कायदा आपले काम करतो. कोणी चुकीचे केले असेल तर तुम्हाला ते भोगावेच लागणार. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हाच या प्रकरणाची चौकशी लावली होती. त्यांनीच प्रशासक बसवण्याचा निर्णय केला. आता या घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास सांगितला आहे. एफआयआर नोंदवून त्याची पहिली चौकशी होईल, चौकशीमध्ये दोषी आढळल्यास तो फिर किसीकी खैर नही, असा इशारा त्यांनी दिला.                                                                                


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: