पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारचा नव्हे, तर लष्कराचाच शब्द अंतिम असतो, हे भारताने अनेकदा म्हटले आहे. आता भारताविरोधात युद्धाची भाषा करणारे इम्रान खान सरकारमधील मंत्री शेख रशीद अहमद यांनी जाहीरपणे याची कबुली दिली आहे.

शेख रशीद यांनी हे मान्य करून एकप्रकारे इम्रान खान यांना उघडे पाडले आहे. पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानमधल्या सरकारचे बॉस आहे. भारताबरोबर युद्धाची भाषा करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानी लष्कराने नियुक्त केले आहे, असे शेख रशीद अहमद म्हणाले. मी युद्धाबद्दल बोलतो. कारण पाकिस्तानला उद्ध्वस्त करायचा नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे.

युद्धाच्या तयारीबद्दल बोलण्यासाठी लष्कराने मला येथे ठेवले आहे. पाकिस्तानकडे स्मार्ट बॉम्ब आहेत, हे मी खूप जबाबदारीने बोलत आहे, असे शेख रशीद अहमद म्हणाले. ते नानकाना साहिब येथे बोलत होते. इम्रान खान सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री असणारे शेख रशीद यांनी पाकिस्तानकडे 125 ग्रॅम ते 250 ग्रॅम वजनाचे छोटे अणुबॉम्ब असून भारताला लक्ष्य करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो असे सांगितले.

गेली काही वर्ष भारताला धमकावण्यासाठी पाकिस्तानी लष्करसुद्धा अशीच भाषा करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, त्यांचे मंत्री आणि पाकिस्तानचे लष्कर भारताविरोधात युद्धाचे इशारे देत आहेत. जगाने काश्मीर प्रश्‍नामध्ये लक्ष घालावे यासाठी अण्वस्त्रांचीही धमकी देत आहेत.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: