एका दिवसात तब्बल 84 अर्ज मागे घेण्याचा विक्रम नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात नोदवला गेला. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकरमध्ये तब्बल 134 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी 91 अर्ज पात्र ठरले.

तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 84 उमेदवारांनी माघार घेतली. भोकरमध्ये केवळ 7 उमेदवार रिंगणात आहेत.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 134 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात 85 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण सध्या भोकरमध्येच अडकून आहेत. भाजपने त्यांना श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या रुपाने तगडं आव्हान दिलं आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेच्या अगोदर 2004 ला याच भोकरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीनिवास देशमुख गोरठेकर विजयी झाले. मात्र 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित बनला. पण यावेळी अशोक चव्हाणांसाठी ही लढाई सोपी राहिलेली नाही.

लोकसभेला अशोक चव्हाण यांना पराभूत केलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं पाठबळ गोरठेकरांसोबत आहे. गोरठेकर हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी आतापासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या मतदारसंघात अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याची खात्री गोरठेकर देतात. गोरठेकर यांच्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून अगदी सूक्ष्म पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: