नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची प्रचार सभा झाली. यावेळी ओवेसींनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, त्यांनी संघावरही निशाणा साधला. काँग्रेस सध्या  मृतावस्थेत असून त्यामध्ये जीव येणे कठीण आहे, तर भाजपमुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची टीका ओवेसींनी केली.

‘आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. मात्र, भाजप ते स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच राफेल लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत दाखल झाले, त्यावेळी त्या विमानाच्या चाकासमोर गृहमंत्र्यांनी लिंबू ठेवला.

त्याबाबत आमचा विरोध नाही. पण, देशातील इतरांनाही त्यांच्या धर्मानुसार वागू दिलं पाहिजे. मात्र, या देशात एक धर्म, एक पक्ष राहील, असं हे सरकार म्हणतं’, असं म्हणत ओवेसींनी भाजपवर घणाघाती टीका केली.

‘मी नागपुरात येऊन संघाबद्दल नाही बोललो, तर मला त्रास होईल. संघाने आमचा आवाज ऐकावा, मी अल्लालाकडे तुम्हाला सदबुद्धी देण्याची दुआ करतो. संघाने सांगितलं देशात मॉब लिंचिंग नाही.

मात्र, झारखंडमध्ये जमावाने एकाचा खून केला, या प्रकरणात ज्याला शिक्षा झाली त्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हार घातला, हे तुमचे संस्कार आहेत का? हे संघाने सांगावं’, असं म्हणत ओवेसींनी संघावरही निशाणा साधला.

‘मॉब लिंचिंगचा संबंध परदेशी आणि धर्माशी आहे, असं सांगितलं जातं. आमचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, तरीही मॉब लिंचिंगमध्ये एखाद्या निर्दोष व्यक्तीला मारत पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायला लावलं जातं. आम्ही जिन्नाला नाकारत गांधी, आंबेडकरांना स्वीकारलं.

आमच्यासाठी हा देश आमचा आहे. आम्हाला हे सर्टिफिकेट तुमच्याकडून घायची गरज नाही. या देशात मॉब लिंचिंग होतं, हे खरं आहे. जे मॉब लिंचिंग करतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असंही ओवेसी म्हणाले.

‘महाराष्ट्रातील सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र मुस्लिमांना दिलं नाही, जर लोकसंख्या कमी झाली पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला शिक्षण द्या, सर्वांना शिष्यवृत्ती द्या’, असंही ओवेसी म्हणाले.

‘या देशात नोकऱ्या नाहीत, मात्र सरकार म्हणतं आम्ही कलम 370 काढलं. त्यातून काय मिळवलं. शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि सरकार काश्मीरचा विषय काढते, महागाईचा विषय काढला तर सरकार पाकिस्तानचा विषय काढते’, असं म्हणत ओवेसींनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

मध्य नागपूर मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अब्दुल शारिक पटेल आणि उत्तर नागपूर मतदारसंघातील किर्ती डोंगरे यांच्या प्रचारसाठी नागपुरात असदुद्दीन ओवेसींनी सभा घेतली. नागपूरच्या मोमिनपुरा फुटबॉल मैदानावर ही सभा घेण्यात आली.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: