आधी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करून नंतर त्याच्याशी कट्टर वैर…आता परत त्याच्या दिशेने उठणारी पावले…तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख नारा चंद्रबाबू नायडू यांचा हा प्रवास पाहून राजकारणी किती झपाट्याने टोप्या फिरवू शकतात याचा अंदाज येतो. चंद्र जसा अमावस्येपासून पौर्णिमा आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कलाकलाने बदलतो तसेच काहीसे चंद्राबाबू यांच्याबाबत घडत आहे.

तीन-चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नायडू यांना उपरती झाली आहे. भाजपशी संबंध तोडणे ही आपली चूक असल्याचे त्यांनी उघडपणे मान्य केले आहे. विशाखापट्टणम येथे आयोजित तेलुगु देसम पक्षाच्य कार्यकर्त्यांच्या बैठकीत नायडू यांनी हा गौप्यस्फोट केला.
“अमरावती, पोलावरम आणि विशेष दर्जा याबाबत आमच्या मागण्यांसाठी आम्ही केंद्रीय मंत्रीमंडळातून बाहेर पडलो. आम्ही भाजपशी संबंध तोडले. मात्र आमचा हा निर्णय आमच्यावरच बूमरँग झाला आणि पक्षाला खूप त्रास सहन करावा लागला,” असे नायडू यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
“आम्ही कठोर परिश्रम घेऊनही जनतेने आम्हाला आणखी एक संधी देण्यास नकार दिला.

काँग्रेसशी आपण केलेली हातमिळवणी लोकांनी स्वीकारली नाही. मी तेलंगाणामध्ये काँग्रेसबरोबर जागा सामायिक करण्याचा निर्णय घेतला आहे, ही चूक होती. त्यावेळी अर्ध्या मार्गावर जाणवलं, की ही गंभीर चूक होती, परंतु खूप उशीर झाला होता, ” असे ते म्हणाले.

यापूर्वी तेलुगु देसम पक्षाच्या बंद दाराआड झालेल्या अनेक बैठकांमध्ये नायडू यांनी काँग्रेसशी युती करण्याबाबत असाच पश्चात्ताप व्यक्त केला होता. तेलांगणा निवडणुकीत नायडू यांनी काँग्रेसशी युती केली होती. मात्र तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) झंझावातापुढे या दोन्ही पक्षांना अवमानकारक पराभव सहन करावा लागला. त्यांची वाताहात झाली.

नायडू हे नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पंतप्रधानकीच्या वेळेस म्हणजे 2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाले होते. मात्र आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून ते एनडीएतून बाहेर पडले. इतकेच नाही तर लोकसभेत तेलुगु देसमच्या वतीने अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्या प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडूंना सावधगिरीचा इशारा दिला होता.

नायडू हे वायएसआर काँग्रेसच्या जाळ्यात सापडले आहेत, असे मोदी म्हणाले होते. परंतु नायडू यांनी त्यांचे ऐकले नाही आणि एनडीएतून ते त्रागा करून बाहेर पडले होते. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी नायडू यांना व त्यांच्या पक्षासाठी एनडीएचे दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट सांगितले होते.

काँग्रेसच्या साथीने लढलेल्या तेलुगु देसमला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. वायएसआर काँग्रेसने विधानसभेत 175 पैकी 151 जागा जिंकल्या, तर तेलुगू देसम पक्षाला 23 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेत वायएसआर काँग्रेसने 22 जागा जिंकल्या, तर तेलुगू देसमला केवळ 3 जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाचे पानिपत केल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ लावले होते. नायडू सरकारने घेतलेले एकामागोमाग एक निर्णय रद्दबादल करण्याचा सपाटा रेड्डी सरकारने लावला आहे.

आधी नायडू यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली. त्यानंतर नायडू त्यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेली ‘प्रजा वेदिका’ इमारत पडण्याचा आदेश जारी करण्यात आला. विशेष म्हणजे ही इमारत नायडू त्यांच्या निवास स्थानापासून अगदी जवळ आहे. सरकारी तसेच तेलुगू देसम पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी या वास्तूचा वापर केला जाई. त्यातच दारुण पराभव झाल्यामुळे तेलुगू देशम पक्षात नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि निराशेची भावना आहे.

त्यातूनच 4 राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाला आहे.
आता विशाखापट्टणममधील बैठकीतील ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात नायडू अत्यंत पश्चात्तापाने बोलताना दिसतात. “मी वैयक्तिक हितासाठी नव्हे तर राज्याच्या हितासाठी प्रयत्न केले. मोदी व माझ्यात अशी कोणती वैयक्तिक वैर होते,” असा प्रश्न त्यांनी केला.

याचाच अर्थ त्यांची पावले पुन्हा भाजपच्या दिशेने पडत आहेत. आता नायडू यांच्या या नव्या पावित्र्यावर राज्य भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र भविष्यात हे , दोन्ही पक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसविरुद्ध एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षाशीही नायडू यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे उद्या चंद्राबाबूंनी मोदींचे मांडलिकत्व पुन्हा पत्करले तर आश्चर्य वाटायला नको.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: