अहमदाबाद : जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम हे भारतात उभारलं जात आहे. जानेवारी २०२० पर्यंत अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचं बांधकाम पूर्ण होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मैदानात भारत विरुद्ध जागतिक-११ असा टी-२० सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. मोटेरा नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात भारताची शेवटची वनडे मॅच २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध झाली होती. यानंतर या स्टेडियमच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली.

अहमदाबादच्या या क्रिकेट स्टेडियममध्ये तब्बल १.१ लाख प्रेक्षक बसू शकणार आहेत. एवढी प्रेक्षक क्षमता असलेलं हे जगातलं हे सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असेल. सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सर्वाधिक ९० हजार प्रेक्षक बसू शकतात. तर कोलकात्याचं ईडन गार्डन ६६,००० प्रेक्षक क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. १८५३ साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड बांधण्यात आलं होतं.

जानेवारी २०१८ मध्ये या स्टेडियमचं भूमीपूजन झालं होतं. गुजरात क्रिकेट असोसिएशननं लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) या कंपनीला हे स्टेडियम बांधण्याचं कंत्राट दिलं. हे स्टेडियम बांधण्यासाठी शापूरजी पालनजी आणि नागार्जून कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनीही अर्ज केले होते. जगप्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एमएस पॉप्युलसनं या स्टेडियमचं डिझाईन केलं आहे. याच फर्मनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचंही डिझाईन केलं होतं.

हे स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे नवं क्रिकेट स्टेडियम ६३ एकर परिसरात पसरलं आहे. या स्टेडियममध्ये ५० रूम असलेलं क्लब हाऊस, ७६ कॉरपोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रूम, क्रिकेटपटूंसाठी ३ प्रॅक्टिस ग्राऊंड, इनडोर क्रिकेट अॅकेडमी, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, ३ हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.

१९८३ साली मोटेरा स्टेडियम बांधण्यात आलं होतं. १९८७ साली सुनिल गावसकर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन याच मैदानात पूर्ण केल्या. त्यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारे गावसकर हे पहिले क्रिकेटपटू बनले. यानंतर ७ वर्षांनी कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलींचा ४३१ विकेटचा विश्वविक्रम मोडीत काढला. १९९९ साली सचिन तेंडुलकरनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक याच मैदानात केलं होतं.

१९८२ साली बांधण्यात आलेल्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता ४९ हजार एवढी होती. १९८३ साली या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात आली. 


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: