हैद्राबाद। आजपासून(6 डिसेंबर)  भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 सामन्यांची टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

 

रोहितने या सामन्यात जर 1 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार पूर्ण करेल. 400 षटकारांचा टप्पा पार करणारा तो जगातील केवळ तिसराच क्रिकेटपटू ठरेल. आत्तापर्यंत केवळ वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल(Chris Gayle) आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने(Shahid Afridi) अशी कामगिरी केली आहे.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार(Most Sixes in International Cricket) मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने 462 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 534 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करणारा तो सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.

 

त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आफ्रिदी आहे. त्याने 524 सामन्यात 476 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर सध्या या यादीत रोहित 351 सामन्यात 399 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने 432 सामन्यात 398 षटकार मारले आहेत.

 

रोहितने कसोटीमध्ये 52 षटकार ठोकले आहेत तर टी20 मध्ये रोहितच्या नावावर 115 षटकार आहेत आणि वनडेमध्ये त्याने 232 षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित पाठोपाठ एमएस धोनी आहे. धोनीने 538 सामन्यात 359 षटकार ठोकले आहेत.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: