तिरुअनंतरपुरम -  रविवारी(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे वेस्ट इंडिजने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

 

या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून खराब कामगिरी पहायला मिळाली. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी वेस्ट इंडिज फलंदाजांचे काही महत्त्वाचे झेल सोडले(dropped catches). यामध्ये भुवनेश्वर कुमारने(Bhuvneshwar Kumar) गोलंदाजी केलेल्या एका षटकातील सलग दोन चेंडूंवर वॉशिंग्टन सुंदर(Washington Sundar) आणि रिषभ पंतने(Rishabh Pant) झेल सोडले.

 

भारताच्या या खराब क्षेत्ररक्षणाबद्दल कर्णधार विराट कोहलीनेही(Virat Kohli) नाराजी व्यक्त केली. तो सामन्यानंतर म्हणाला, ‘जर आम्ही इतके खराब क्षेत्ररक्षण केले तर फलंदाजांनी कितीही धावा केल्या तरी कमीच पडणार आहे. मागील 2 सामन्यांपासून आमचे क्षेत्ररक्षण खराब होत आहे.’

 

विराट पुढे म्हणाला, ‘आम्ही एकाच षटकात 2 झेल सोडले. कल्पना करा जर ते दोन झेल पकडले गेले असते तर वेस्ट इंडिजवर किती दबाव आला असता. सर्वांनी पाहिले की आम्हाला अधिक धैर्य दाखवून क्षेत्ररक्षण करण्याची गरज आहे. आता मुंबईत करो या मरोचा सामना असेल.’

 

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या होत्या. भारताकडून शिवम दुबेने(Shivam Dube) 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने नाबाद 33 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना केसरिक विल्यम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: