ऑकलंड: भारताचा न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात २२ धावांनी पराभव झाला असून त्याचबरोबर ३ सामन्यांची मालिका देखील भारतीय संघाने गमावली. आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर भारताच्या विजयासाठी रविंद्र जडेजा संघर्ष केला, पण त्याला यश आले नाही. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण २५१ धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला.

 

न्यूझीलंडच्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. झटपट दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विराट कोहली देखील १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर संपूर्ण दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा केएल राहुल देखील ४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ केदार जाधव ९ धावांवर माघारी परतला. केदार बाद झाला तेव्हा ५ बाद ९६ अशी भारताची अवस्था होती.

 

भारताचा मोठा पराभव होईल असे वाटत असताना अर्धशतकी खेळी करून श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो खराब शॉर्ट खेळून ५० धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने अखेरच्या १० षटकात शानदार खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. नवदीप सैनीसह आठव्या विकेटसाठी त्याने ७६ धावांची भागीदारी केली. सैनीने ४५ धावा केल्यानंतर देखील आपला संघर्ष जडेजाने सुरु ठेवला. पण तो ४९व्या षटकात बाद झाला. जडेजाने ७३ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह ५५ धावा केल्या.

 

तत्पूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑकलंड येथील ईडन पार्कवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने शानदार सुरूवात केली. मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. निकोलस याला चहलने ४१ धावांवर बाद कर न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि ब्लंडेल यांनी संघाला १५०च्या जवळ पोहोचवले. तेव्हाच ब्लंडेलला शार्दुलने बाद केले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल धावाबाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळण्यास सुरुवात झाली. गप्टिल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १५७ अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी न्यूझीलंडची अवस्था ८ बाद १९७ अशी केली.

 

रॉस टेलरने अखेरच्या षटकात आक्रमक खेळ केला काईल जेमीसनने त्याला चांगली साथ दिली. टेलरने नाबाद ७३ धावा केल्या. नवव्या विकेटसाठी टेलर-जेमीसन जोडीने नाबाद ७६ धावांची भागीदारी केली. ऑकलंड मैदानावर आणि न्यूझीलंडकडून नवव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली.भारताकडून यजुवेंद्र चहलने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराहने २ आणि रविंद्र जडेजाने एक बळी घेतला.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: