स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतून महामानवाची गौरवगाथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या बालपणीची भूमिका साकारली बालकलाकार अमृत गायकवाडने, त्यानंतर बाबासाहेबांच्या बालरुपात श्रीहरी अभ्यंकरने प्रेक्षकांची मनं जिंकली.

संकेत कोर्लेकरने साकारलेल्या तरुणपणीच्या बाबासाहेबांच्या भूमिकेवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. लवकरच अभिनेता सागर देशमुख बाबासाहेबांच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सागरच्या एण्ट्रीने मालिकेतही नवा अध्याय सुरु होणार आहे. पुढील शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाडांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांच्या अटीनुसार बाबासाहेबांना बडोद्याला नोकरीनिमित्ताने जावं लागणार आहे. मात्र नोकरी करण्यास बाबासाहेबांच्या वडिलांचा नकार आहे.

त्यामुळे सजायीराजेंना दिलेला शब्द पाळावा की वडिलांचं मन राखावं अश्या द्विधा मनस्थितीत अडकलेले बाबासाहेब बडोद्याला जायचं ठरवतात. बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे रामजी बाबा दुखावतात. जातियतेचा विखारी अनुभव बडोद्यामध्येही येईल याची बाबासाहेबांना पुर्वसुचना देतात. मात्र बाबासाहेब सयाजीराजेंना दिलेला शब्द पाळण्यासाठी बडोद्याला रवाना होतात. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत रमाई संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेते. वचनपूर्तीसाठी कुटुंबाची होणारी ताटातूट बाबासाहेबांना अस्वस्थ करते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक प्रसंग मालिकेतून पाहायला मिळणार आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: