चांद्रयान-2चा लँडर विक्रम चंद्रावर उतरण्यापूर्वी फक्त 2.1 किमी अंतरावर इस्रोशी संपर्क तुटला. विक्रमचा संपर्क का तुटला किंवा तो क्रॅश तर झाला नाही? याबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु 978 कोटी रुपये खर्चाच्या चांद्रयान -2 मोहिमेत सर्व काही संपले असे मुळीच नाही.

भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (इस्रो) अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर हे या मोहिमेचे केवळ 5 टक्के आपण गमावले आहे. उर्वरित 95 टक्के चांद्रयान -२ ऑर्बिटर अजूनही चंद्राला घिरट्या घालत आहे.

हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत कार्यरत राहणार असून यादरम्यान चंद्राची अनेक छायाचित्रे इस्रोला पाठवू शकतो. ऑर्बिटर लँडरची छायाचित्रेही घेऊन पाठवू शकतो. जेणेकरून त्याची स्थिती जाणून घेता येईल. चांद्रयान -२ अंतराळयानाचे ऑर्बिटर (2,379 किलो, आठ पेलोड), विक्रम (1,471 किलो, चार पेलोड) आणि प्रज्ञान (27 किलो, दोन पेलोड) असे तीन विभाग आहेत.

विक्रम 2 सप्टेंबर रोजी ऑर्बिटरपासून विभक्त झाला. 22 जुलै रोजी चांद्रयान -2 प्रथम अंतराळात भारताच्या अवजड रॉकेट जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन-मार्क 3 (जीएसएलव्ही एमके 3) च्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात आले.

विक्रम लँडरशी संबंध तुटल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. काही नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान आपल्याला प्रेरित करते आणि यामुळे आपले भविष्यातील यश निश्चित होते. जर ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक कोणी असेल तर ते विज्ञान आहे. विज्ञानामध्ये कोणतेही अपयश नाही, केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतात.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: