रिलायन्स जिओने अवघ्या काही वर्षांमध्ये मोबाइल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला, त्याचबरोबर जिओने पुन्हा एकदा डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी मारली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी डाऊनलोड स्पीड ऑगस्ट महिन्यात 21.3 एमबीपीएस एवढा नोंदवण्यात आला. याबाबतची माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायने जाहीर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. दरम्यान, व्होडाफोन या कंपनीने 5.5 एमबीपीएस अपलोड स्पीडसह अपलोडींग स्पीडमध्ये बाजी मारली आहे.

ट्रायच्या अहवालात जिओनंतर सरासरी सर्वाधिक डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेलने दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एअरटेलच्या ग्राहकांना 8.2 एमबीपीएसचा डाऊनलोड स्पीड मिळत असल्याचे ट्रायने म्हटले आहे. तर त्या खालोखाल व्होडाफोन (7.7 एमबीपीएस) आणि आयडीया सेल्युलर (6.1 एमबीपीएस) या कंपन्यांचा क्रमांक येतो.

व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचे विलिनीकरण झाले असले तरी दोन्ही कंपन्यांबाबत ट्रायकडून वेगवेगळा अहवाल सादर करण्यात येतो. दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्क एकत्रिकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. अपलोड श्रेणीमध्ये जिओ (4.4 एमबीपीएस) आणि एअरटेल (3.1 एमबीपीएस) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, अद्यापही 4 जी स्पेक्ट्रमच्या प्रतिक्षेत सरकारी कंपनी बीएसएनएल आहे. 3 जी डाऊनलोडींग स्पीडमध्ये बीएसएनएल पहिल्या क्रमांकावर आहे. ट्रायच्या अहवालानुसार बीएसएनएलचा सरासरी डाऊनलोड स्पीड 2.6 एमबीपीएस तर अपलोड स्पीड 1.2 एमबीपीएस आहे. तर यानंतर डाऊनलोड स्पीडमध्ये आयडिया सेल्युलर (2 एमबीपीएस), व्होडाफोन (1.8 एमबीपीएस) आणि एअरटेल (1.5 एमबीपीएस) यांचा अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक येतो. तर थ्रीजी सेवांमध्ये अपलोड स्पीडमध्येही बीएसएनएलनेच बाजी मारल्याचे दिसत आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: