पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी गट क्रमांक तीनमध्ये “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर 34 हजार 300 ऑनलाइन जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी मंगळवारी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

“प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावरील प्रवेशात 2 गटांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दहावीच्या परीक्षेत 35 ते 100 टक्‍के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गट क्रमांक 3 मधून प्रवेश देण्यात येणार आहे. 27 व 28 ऑगस्ट रोजी यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. रिक्‍त जागांचा तपशील जाहीर होणार आहे.

विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा रिक्‍त सध्या 40 हजार 788 प्रवेशाच्या जागा रिक्‍त राहिल्या आहेत. यात अल्पसंख्याक कोट्यातील 2 हजार 469, इनहाऊस कोट्यातील 1 हजार 878, व्यवस्थापन कोट्यातील 2 हजार 141 एवढ्या जागा रिक्‍त आहेत. ऑनलाइन प्रवेशात मराठी माध्यमाच्या कला शाखेच्या 3 हजार 447, इंग्रजी माध्यमाच्या 4 हजार 424, विज्ञान शाखेतील 14 हजार 190, वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमातील 3 हजार 888, इंग्रजी माध्यमातील 8 हजार 351 जागा रिक्‍त आहेत. विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा रिक्‍त आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी केले आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: