मुंबई : सत्ता येते, सत्ता जाते. मात्र पाय जमीनीवर ठेवावे लागतात, असा टोला लगावतानाच सत्ताधारी शिवसेना-भाजपाला सत्तेचा उन्माद नडला. हा उन्माद जनतेला पसंत पडला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. राज्यात राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच दिवाळीनंतर राष्ट्रवादीचे तसेच मित्रपक्षांच्या नेत्यासोबत बैठक घेऊन व्यापक धोरण ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडतानाच त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाला फटकारले.

“अब की बार 220 पार’ असा नारा देणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलेले नाही. भाजपा-शिवसेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही. त्यांनी सीमा ओलांडली होती. मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते, असा टोला त्यांनी लगावला.

जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसवले आहे. आम्ही त्याचा स्वीकार करतो, असे स्पष्ट करतानाच जनतेने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही आमचा पक्ष मित्रपक्ष यांना घेवून काम करणार आहोत, असे पवार म्हणाले. महाआघाडीतील सर्व पक्षांनी मनापासून परस्परांना सहकार्य केले, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतूक केले. तसेच पक्षांतर केलेल्या आमदारांनाही लोकांनी नाकारले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.                                                     


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: