उन्नावअयोध्येतील राम मंदिरासंदर्भात भाजपच्या नेत्याने एक मोठ वक्तव्य केले आहे. येत्या 6 डिसेंबरपासून अयोध्येत राम मंदिराचे काम आम्ही सुरु करू असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. अयोध्येतील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात आता कोर्ट कधीही निर्णय जाहीर करू शकते. अशा वेळी साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य करून सर्वांना धक्का दिला आहे.

भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी राम मंदिरासंदर्भात वक्तव्य केले आहे. अयोध्यातील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांचे मी आभार मानतो. त्यांनी दोन्ही पक्षांचे मत गंभीरपणे ऐकून घेतले. यासंदर्भात पुरातत्व विभागाने त्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. तर शिफा वक्फ बोर्डाने देखील अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे असे न्यायालयात सांगितल्याचे साक्षी महाराज म्हणाले.

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयात 40 दिवस सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010मध्ये निकाल दिला होता. उच्च न्यायालयाने तेव्हा 2.77 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडी आणि राम लल्ला यांच्यात समान विभागून द्यावी असा निर्णय दिला होता.

या निकालाच्या विरोधात 14 याचिका दाखल झाल्या होत्या.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याने अयोध्या जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपासून कलम 144 लागू करण्यात आले असून ते 10 डिसेंबरपर्यंत लागू असेल.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: