मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची आज भेट झाली. आठवलेंनी पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन, त्यांची भेट घेतली. यावेळी आठवलेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा सल्ला विचारला. त्यावर पवारांनी सेना-भाजपनेच सरकार स्थापन करायला हवं असं आठवलेंना सांगितलं.

पवार म्हणाले, “सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती दुरुस्त व्हावी, एवढ्या मोठ्या राज्यात इतके दिवस सरकार नाही, हे योग्य नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर होईल. याची चिंता आठवलेंनाही आहे. त्यामुळे ते सल्ला विचारण्यासाठी आले होते.

आमच्या दोघांचं एकमत आहे, की या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं आहे.त्यामुळे त्यांनी लवकर सरकार बनवावं. महाराष्ट्रात स्थिरता येईल याची काळजी त्यांनी घ्यावी. असं माझं मत मी आठवलेंना सांगितलं. त्यांचंही तेच आहे. त्या दृष्टीने त्यांनी अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माझी आहे”.

संसदेत आरपीआयचे खासदार किती आहेत यापेक्षा रामदास आठवले यांचं राजकीय पक्षांमध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यांनी काही मत मांडलं, तर सत्ताधारी गांभिर्याने घेत असतात. त्यामुळे आजच्या या परिस्थितीत त्यांचा हा सल्ला महाराष्ट्राच्या हिताचा राहिल, तो त्यांनी भाजप आणि शिवसेनेला द्यावा, अशी सूचना मी आठवलेंना केली. मला विश्वास आहे की त्यासंबंधीची काळजी ते घेतील, असं शरद पवार म्हणाले.

                 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: