मुंबई: कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा यशस्वीपणे करु न शकल्यामुळे राज्यपाल भगत सिंह काश्योरी यांच्या शिफारशी नुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यातच आता राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष लवकरात लवकर सोडवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली आहे.

आगामी दोन दिवसांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार असून या भेटीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्यामुळे येत्या राज्यातील सत्तापेच रविवारी १७ नोव्हेंबरपर्यंत संपुष्टात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले असल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही काँग्रेसची किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काल बैठकही झाली.

किमान समान कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यानंतर त्या मसुद्यावर शिवसेनेसोबत चर्चा करून काही गोष्टींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर सत्तेतील पदांच्या वाटपाचे सूत्र ठरवण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यापार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून राज्यातील परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

त्यानंतरच राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये रविवारी होणाऱ्या बैठकीकडे महाराष्ट्रसह देशातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: