काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला सामना १२ मार्च रोजी धरमशाला येथे होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला.

 

त्यानंतर उर्वरित २ सामने अनुक्रमे १५ मार्च आणि १८ मार्च रोजी होणार होते. पण, कोरोना व्हायरसचा जगभर वाढता प्रकोप पाहता बीसीसीआयने क्रिकेट दक्षिण आफ्रिकाशी चर्चा करून वनडे मालिका रद्द केली आहे.

 

दक्षिण आफ्रिकाविरुद्धची वनडे मालिका ही भारतीय संघासाठी आयपीएल २०२०पुर्वीची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका होती. परंतु ही मालिका रद्द झाल्याने चाहत्यांना पुढील मालिकेसाठी बरीच वाट पाहावी लागणार आहे.

 

भविष्यातील वेळापत्रकानुसार भारताची पुढील आंतरराष्ट्रीय मालिका ही श्रीलंका विरुद्ध असेल. ही मालिका जूनमध्ये सुरु होणार असून यावेळी ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जातील. यानंतर ऑगस्टमध्ये भारताला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जायचे आहे. यावेळी दोन्ही संघादरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

 

या मालिका पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये आशियाई चषक खेळले जाईल. ते संपताच भारत विरुद्ध इग्लंड संघात ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. तर, ऑस्ट्रेलियात पुढे होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ३ सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे.                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: